281 persons from solapur rural area keep in institutional quarantine 
281 persons from solapur rural area keep in institutional quarantine  
राज्य

सोलापूर ग्रामीण भागातील 281 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : सोलापूर शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातही संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

सोलापूर शहरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोलापूर शहरा नजीक असलेल्या ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पोहोचू नये यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे.

ग्रामीण भागातील 451 जणांना आत्तापर्यंत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 170 जणांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. अद्यापही (आकडेवारी गुरुवार, 23 एप्रिल पर्यंतची) 281 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये दाखल आहेत. 

अक्कलकोट, उत्तर सोलापूर, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, सांगोला, दक्षिण सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ या तालुक्‍याच्या ठिकाणी एकवीस ठिकाणी इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 681 खोल्या तयार केल्या असून त्यामध्ये एक हजार सहाशे 67 जणांना क्वारंटाइन करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. करमाळा तालुक्‍यातील 139, बार्शी तालुक्‍यातील 110, मोहोळ तालुक्‍यातील 22, मंगळवेढा तालुक्‍यातील सहा, माढा व अक्कलकोट तालुक्‍यातील प्रत्येकी दोन असे 281 जण सध्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, कालावधी पूर्ण झालेल्या 170 जणांना सोडण्यात आले असून त्यामध्ये करमाळा तालुक्‍यातील 39, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 68, बार्शी तालुक्‍यातील 52, माळशिरस तालुक्‍यातील नऊ, मंगळवेढा तालुक्‍यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.

ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. अन्य जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांचीही तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास व्यक्तींवर व कोरोना संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT